मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहता येणार नसून, भविष्यात मिळणारे घर, परिसर आणि रोजगारासाठीची जागा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाबाबत पसरलेल्या अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून नागरिकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांसाठीची घरे, उद्योगांसाठीच्या सुविधा आणि भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे डिजिटल व प्रत्यक्ष दर्शन घडविणाऱ्या अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारलेल्या या केंद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना आणि अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून ती एक मोठे आर्थिक केंद्र आहे. धारावीतील कुंभारवाडा, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच विविध लघु आणि मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांची ओळख आणि सन्मान कायम ठेवत त्यांना अधिक चांगल्या आणि नियोजित कार्यस्थळांची सुविधा देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये आजची धारावी, पुनर्विकासानंतरचे भविष्यातील स्वरूप आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची ‘रिअल टाइम’ माहिती उपलब्ध होणार आहे. रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी मिळणार असल्याने हे केंद्र नागरिकांसह नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक दृश्य-श्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यापर्यंतचा प्रवास या केंद्रात दाखविण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे अनावरण तसेच ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.




