मुंबई : ओला आणि उबरसारख्या ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांच्या धर्तीवर आता राज्यातील रुग्णवाहिका सेवाही नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या नव्या धोरणानुसार नागरिकांना मोबाईल ॲप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून जवळची रुग्णवाहिका सहज बुक करता येणार आहे. रुग्णवाहिकेचे सध्याचे लोकेशन, घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ तसेच सेवेसाठी आकारले जाणारे शुल्क याची माहितीही या डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार आहे. परिवहन, आरोग्य आणि संबंधित विभागांकडून या प्रस्तावावर काम सुरू असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक किंवा खासगी रुग्णवाहिका सेवांशी संपर्क साधावा लागतो. मात्र, अनेकदा गरजेच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब होतो. त्यामुळे प्रस्तावित व्यवस्थेमुळे राज्यभरातील उपलब्ध रुग्णवाहिकांची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध होऊन नागरिकांना तातडीने सेवा मिळण्यास मदत होणार आहे. परिवहन विभागाकडे राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) नोंदणीकृत रुग्णवाहिकांची माहिती उपलब्ध आहे.
अपघात किंवा गंभीर आजाराच्या परिस्थितीत ‘गोल्डन अवर’ म्हणजेच सुरुवातीचा महत्त्वाचा वेळ रुग्णाच्या उपचारासाठी अत्यंत निर्णायक असतो. राज्यात गेल्या पाच वर्षांत दरवर्षी सरासरी १६ हजारांहून अधिक प्राणघातक अपघात झाले असून, त्यात सरासरी १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावी करण्यावर परिवहन विभागाचा भर आहे. प्रस्तावित ॲप आणि वेबसाइटवर रुग्णवाहिका कुठे आहे, ती घटनास्थळी किती वेळात पोहोचेल आणि त्यासाठी किती शुल्क आकारले जाईल, याची माहिती मिळणार आहे. या व्यवस्थेत रुग्णालयांनाही सहभागी करून घेतले जाणार असून, खासगी रुग्णवाहिका चालकांना या डिजिटल व्यासपीठावर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. भविष्यात डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुविधांचाही या सेवेत समावेश करण्याचा विचार करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकांसाठी सुलभ होण्याची अपेक्षा आहे.




