पुणे : शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. आतिश आदित्य मोहिते (वय ३१, रा. देवकर चाळ, रामवाडी, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अनिल शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आतिश मोहिते यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला गेल्या वर्षी १६ मार्च रोजी पुणे शहर, पिंपरी, तसेच जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो आदेशाचा भंग घेऊन येरवडा भागात आल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने येरवडा भागातील वाडिया बंगल्याजवळ सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. बेकायदा शस्त्र बाळगणे, तडीपार केल्यानंतर आदेशाच भंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पोलीस हवालदार खैरे तपास करत आहेत.