मुंबई : जोगेश्वरीतील मातोश्री संकुलाबाहेर झालेल्या राडा प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या महिला कार्यकर्त्यांचे कपडे फाडून त्यांना नखे मारून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप केला. मात्र यावर आता प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व मतदार संघाचे उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांनी वायकर यांचे सर्व आरोप खोडून काढले. शिवाय महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा, असे आव्हान देखील नर यांनी वायकर यांना दिले आहे. ज्या आदित्य ठाकरे यांना तुम्ही बालिश म्हणता त्यांच्या मातोश्रीमुळेच अंधेरीतील तुमची मातोश्री उभी राहिली आहे. जोगेश्वरी अंधेरीतील प्रत्येक शिवसैनिकाचे यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिश्रम आहेत. माझ्या सुनेबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यावर मी आता काही बोलणार नाही असेही नर यावेळी म्हणाले. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारंसघातून उद्धव ठाकरे यांनी बाळा नर यांना उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ३५ वर्ष काम केलं आहे. पाचशे पाचशे महिला आमच्या कार्यक्रमाला येतात. महिलांच्या पदराआड लपण्यापेक्षा समोर या, असं आव्हान बाळा नर यांनी दिले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं बाळा नर रवींद्र वायकर यांना म्हणाले. शिवसेनेनं मला दोनदा तिकिट दिलं, माझ्या मेहनतीमुळं दिला, असं बाळा नर म्हणाले.
रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर आणि उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांच्या विरोधात आरोप केले होते. ठाकरे गटानं पोलिसात तक्रार करणं आवश्यक होतं, असं वायकर यांनी म्हटलं. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात काल रात्री राडा झाला होता.रवींद्र वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यातून वाद वाढल्याने, पोलिसांनी या मध्ये हस्तक्षेप करावा अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती. यातून दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड अडवत वायकरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांवर एकमेकांकडून काही प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचेही समोर आला होता.