मुंबई : ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय, तालुकापातळीवर तालुकास्तरीय समिती आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी वॉर्ड स्तरीय समिती तातडीने गठीत करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी घेतला. या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई शहर, अकोला, धाराशिव,हिंगोली,वर्धा जिल्हाधिकारी (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी आणि या समित्या तातडीने गठित करव्यात. असे सांगून राज्यातील या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्जांची सद्य: स्थिती याबद्दल त्यांनी माहिती घेतली.