पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले होते. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कारवाईत शहरातील रस्त्यांवर विनानोंदणी धावणारी वाहने आढळली. ही वाहने विनानोंदणी थेट ग्राहकांच्या हाती देणाऱ्या वितरकांवर केवळ १० दिवस व्यवसाय परवाना निलंबनाची कारवाई आरटीओने केली आहे. त्यामुळे या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरटीओने २२ मे ते १ जून या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत ११ विनानोंदणी वाहने आढळली. त्यानंतर ग्राहकांच्या हाती विनानोंदणी वाहने देणाऱ्या ११ वितरकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात पुणे आरटीओच्या हद्दीतील ६, सातारा आरटीओ ३ आणि अकलूज व श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रत्येकी एक अशा ११ वितरकांचा समावेश होता. पुण्याबाहेरील वितरकांबाबत संबंधित आरटीओंना कळविण्यात आले. या प्रकरणी पुण्यातील ६ वितरकांचा व्यवसाय परवाना ८ ते १७ जुलै या कालावधीत केवळ १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.
वितरकाने नोंदणी करूनच वाहन ग्राहकाच्या हवाली करावे, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करून वितरकांनी नोंदणी न करता वाहन थेट ग्राहकांना दिल्याचे निदर्शनास आले. अशा वितरकांवर कारवाईचे अधिकार आरटीओला आहेत. त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र ६ महिन्यांपर्यंत रद्द केले जाऊ शकते. प्रत्यक्षात पुण्यातील सहा वितरकांवर केवळ १० दिवसांची परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. वितरकाला व्यवसाय परवाना निलंबनाच्या कालावधीत वाहन विक्रीसह इतर व्यवसाय करता येत नाहीत, असे आरटीओचे म्हणणे आहे. याच वेळी कारवाई झालेल्या वितरकांनी वेगळीच माहिती दिली. ‘निलंबनाच्या कालावधीत आम्ही नोंदणीसाठी पाठविलेल्या वाहनांची नोंदणी तेवढी आरटीओने केली नाही, आमचे इतर व्यवसाय सुरू होते,’ अशी माहिती वितरकांनी दिली. त्यामुळे वितरकांवर नेमकी काय कारवाई झाली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.