मुंबई : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतू ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.