पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे चार बांगलादेशी घुसखोर पिंपरी- चिंचवडसह पुण्यात राहात होते. त्यांच्याकडे काही बनावट कागदपत्रे आढळली आहेत. जन्म दाखला, आधारकार्ड आणि पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्रे मिळाली असून पैकी दोघांनी त्याआधारे पासपोर्ट काढण्याचे देखील पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अखेर सांगवी पोलिसांनी चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.
सागोर सुशांतो बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी वोबेन बिश्वास आणि रोनी अनुप सिकंदर अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागोर बिश्वास हा सांगवी पोलीस ठाण्यात व्हेरिफिकेशनसाठी गेला होता. पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी कामकाज पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बिश्वास याच्यावर संशय आला. त्याने दिलेल्या कागदपत्रांवरील पत्त्यावर जाऊन पोलिसांनी खात्री केली, तेव्हा तो त्या ठिकाणी राहत नसल्याचं समोर आलं. तसेच व्हेरिफिकेशनसाठी दिलेला जन्माचा दाखला आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाल. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर पुनावळे आणि पुणे कॅम्पमधून तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. हे चारही जण गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असल्याचं समोर आलेल आहे. त्यांच्याकडे कुठलाही व्हिसा नव्हता. चारही जणांनी बांगलादेशमधून भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.