पुणे : नशेसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदेशीररीत्या विक्री करणार्या एका महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १ लाख रुपये किंमतीच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) तब्बल १६० बाटल्या जप्त केल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत. यादरम्यान, हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी या भागात राहणारी महिला बेकायदेशीररित्या नशेच्या औषधाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या १६० बाटल्या जप्त केल्या. आरोपी अंबिका ऊर्फ नेहा ठाकुर हिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नाही. तसेच, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषधमध्ये केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असताना सुद्धा अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता मिळून आली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे व गायत्री पवार यांच्या पथकाने केली आहे. संबंधित महिला यापूर्वी नशामुक्ती केंद्रात राहून आलेली आहे. त्यानंतर तिने अशाप्रकारे औषध विक्री सुरू केली. औषधाची बाटली चारशे ते पाचशे रुपयांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने हे औषध कोठून आणले, याबाबत हडपसर पोलीस तपास करत आहेत. यापूर्वी देखील या औषधाच्या अवैध विक्रीचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. त्यामुळे शहरात असे विक्रेते सक्रिय असल्याचा अंदाज आहे.