मुंबई : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी, सृजनशील आणि दूरदृष्टी असलेला कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीच्या एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सर्जनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेच्या बळावर मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सक्षमपणे उभी करत त्यांनी मराठी नाट्यविश्व समृद्ध केले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, शिस्त, सर्जनशीलता आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाफ दिसून येत असे. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ मराठी रंगभूमीपुरते मर्यादित न राहता भारतीय नाट्यविश्वासाठीही प्रेरणादायी ठरले.
सुनेत्रा पवार यांनी पुढे म्हटले आहे की, विजया मेहता यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमी, कलासाधना आणि नव्या पिढीतील कलाकार घडविण्यासाठी समर्पित होते. त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून आणि मार्गदर्शनातून अनेक कलाकारांना घडवले तसेच मराठी रंगभूमीला नवी विचारधारा दिली. त्यांच्या कार्यातून निर्माण झालेला सांस्कृतिक वारसा आणि कलात्मक मूल्ये भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून, त्यांनी प्रज्वलित केलेला सृजनशीलतेचा दीप पुढील अनेक वर्षे कलाकारांना प्रेरणा देत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विजया मेहता यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.







