मुंबई : राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मोटार वाहनांच्या प्रदूषण तपासणी प्रमाणपत्रासाठी (PUC) आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. प्रदूषण तपासणी केंद्र चालकांच्या संघटनेने शुल्कवाढीची मागणी केली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक १२९०६/२०२६ (All PUC Centers Owners Association विरुद्ध State of Maharashtra & Anr.) मध्ये ४ मे २०२६ रोजी आदेश देण्यात आले होते. या न्यायालयीन आदेशाच्या पार्श्वभूमीवर शासन पत्र क्रमांक एमव्हीआर ०५२५/प्र.क्र.२२२/परि.२, दिनांक १७ जुलै २०२६ नुसार राज्यातील वाहनांच्या प्रदूषण तपासणी शुल्काच्या सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली आहे. वाढलेल्या शुल्कामुळे वाहनधारकांना आता PUC प्रमाणपत्रासाठी पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रदूषण तपासणी केंद्रांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ, तांत्रिक खर्च आणि इतर बाबींचा विचार करून ही शुल्कवाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार दुचाकी वाहनांसाठी पूर्वी ५० रुपये शुल्क आकारले जात होते, ते आता ६० रुपये करण्यात आले आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी शुल्क १०० रुपयांवरून वाढवून १२० रुपये करण्यात आले आहे. पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी पूर्वी १२५ रुपये शुल्क होते, आता त्यासाठी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रदूषण तपासणी शुल्कातही वाढ करण्यात आली असून, पूर्वी १५० रुपये असलेले शुल्क आता १८० रुपये करण्यात आले आहे. या सुधारित दरांची अंमलबजावणी राज्यातील सर्व PUC केंद्रांवर करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या (PUC Center) मालकांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्राच्या दर्शनी भागात सुधारित शुल्क दराचे फलक स्पष्टपणे आणि ठळकपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तपासणीपूर्वीच शुल्काची माहिती मिळणार आहे. प्रशासनाने सर्व केंद्र चालकांनी नव्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने PUC प्रमाणपत्राला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत प्रदूषण तपासणी करून वैध प्रमाणपत्र जवळ ठेवावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





