पुणे : व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत होत्या. दरम्यान, हॅकरने त्यांचं अकाऊंट परत देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे ४०० डॉलर्सची (तब्बल ३३,५०० रुपये) मागणी केली. त्यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट दुसऱ्या डिव्हाईसवरून चालवलं जात होतं. दरम्यान, सायबर पोलिसांनी सुप्रिया सुळे यांचं अकाउंट रिकव्हर करून दिलं आहे. खासदार सुळे यांनी स्वतःच एक्स या समाजमाध्यमाद्वारे माहिती दिली होती की “माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. कोणीही मला मेसेज करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदाराचा फोन व व्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. व्हॉट्सॲप रिकव्हर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व.
दरम्यान, खासदार सुळे यांनी नागरिकांना एक सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, नागरीकांना माझी विनंती आहे की आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजीटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घायला हवी. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी हॅकरकडून अकाऊंट परत मिळवण्यासाठी पैसे दिले नाहीत. पोलिसांनी व व्हॉट्सॲप टीमने त्यांचं अकाऊंट परत मिळवून दिलं आहे.