मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये आणल्या आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी मुंबईत अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत. मात्र, गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील लोंबकळणाऱ्या केबल, झाडांच्या वाढलेल्या फांद्या हटवाव्यात, तसेच भारतमाता, डिलाइल रोडवरील सिग्नलचे खांब बदलावेत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या गाड्या हलविण्याबाबत उपाययोजना करावी आदी मागण्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी फणसाळकर यांना निवेदन दिले आहे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली (मुंबईचा राजा), रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, वाणी चाळ, सोराब चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (डिलाइल रोडचा राजा) व अन्य मंडळांनी काही समस्या समन्वय समितीच्या निदर्शनास आणल्या आहेत. आर्थर रोड येथील सात रस्ता, मोनो रेल्वे स्टेशन येथे काही लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. या खांब्यांचा आगमन व विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होणार आहे. हे खांब खूपच कमी उंचीवर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे लालबाग, लोअर परळ, काळाचौकी येथील गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका या मार्गाने काढता येऊ शकत नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले.
सात रस्ता ते आग्रीपाडा पोलिस ठाणे या भागात सुरू असलेल्या भूमिगत मेट्रो स्टेशनच्या वरील रस्ता खूपच खराब व निकृष्ट झाला आहे. खेतवाडी, गिरगाव विभागातील गणेशमूर्तींचे आगमन येथून झाल्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी ‘मोनो’, ‘मेट्रो’ रेल्वेच्या महाकाय लोखंडी खांबांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत कुठलेही विघ्न येऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन सुरळीत होण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती २५ फुटांपेक्षा उंच आहेत. त्यामुळे या मूर्ती मंडपामध्ये तसेच विसर्जनासाठी नेताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत. तसेच खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते समप्रमाणात करावेत अशी मागणीही समितीने प्राधान्याने केली आहे.