कल्याण : कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेतील एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शाळेतील एका शिक्षेककडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो (१२) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयडियल शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आत्महत्या करण्यापूर्वी विघ्नेशने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने शाळेतील त्याच्या एका शिक्षिकेकडून त्रासाची माहिती देऊन त्याला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
कोळसेवाडी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. एका राजकीय व्यक्तिशी संबंधित ही शिक्षण संस्था आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी कल्याण जवळील वरप येथे सेक्रेड हार्ट शाळेतील अनीश दळवी या विद्यार्थ्याने शाळा चालकांच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शाळेचे संचालक आल्विन ॲन्थोनी यांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली होती. अलीकडे शिक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थी आत्महत्या करू लागल्याने पालक वर्गाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. काही विशिष्ट शाळांमध्ये हा प्रकार अधिक असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.