मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. संजय पांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय पांडेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मात्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सभा, बैठका, चर्चासत्रांना सुरूवात झाली आहे. राजकीय मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. अशातच माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीदेखील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी स्वत:च आपल्या उमेदवारीची घोषणाही केली आहे.पण त्याचबरोबर कोणत्याही पक्षासोबत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी (११ ऑगस्ट) संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरूवातही केली.