रायगड (सचिन कदम) : रायगड जिल्ह्यात वाढते तापमान, दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि घटता जलसाठा यामुळे संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) २० जून ते ३० जून २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या मते, सध्या जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्यांवर मोठा ताण निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राखणे ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे. भारतीय हवामान विभागाने २० जून रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. मात्र, या अंदाजानंतरही मान्सूनची अपेक्षित प्रगती अद्याप झालेली नसल्याने प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेतली आहे.
एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याचे चित्र असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील जलसाठ्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १७.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर हेटवणे मध्यम प्रकल्पात २७.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच महावेध पोर्टलवरील आकडेवारीनुसार २० जूनपर्यंत जिल्ह्यात अवघ्या ८.९ मिलीमीटर, म्हणजेच सरासरीच्या सुमारे दोन टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी स्विमिंग पूल बंद ठेवणे, पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि अनधिकृत पाणीवापर थांबवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. यासाठी सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, पनवेल महानगरपालिका, ग्रामपंचायती, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव तात्काळ बंद राहतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यातील संभाव्य कपातीबाबत नागरिकांना आगाऊ सूचना देऊन पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता नागरिकांनीही जबाबदारीने पाण्याचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







