मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वय, गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. गुन्हेगार, असामाजिक घटक आणि निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या निर्माण करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. बीएनएसएस अंतर्गत ९६,४४८ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम ९३ अंतर्गत ५७२७, पीआयटीएनडीपीएस अंतर्गत १, एमपीडीए १९८१ अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश १०४ तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तडीपारीच्या १३४३ कारवाया करण्यात आल्या आहेत. अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी, फरारी व पाहिजे आरोपी यांना अटक, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, अवैध दारू, रोख रक्कम, अंमली पदार्थ, फ्रिबीज जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये जमा करण्यात आलेल्या परवानाकृत अग्निशस्त्रांची संख्या ५६,६३१ असून २८,५६६ अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ३९६ अवैध अग्निशस्त्र तर १८५६ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्तीच्या कारवाईमध्ये ७४.८९ कोटी रुपये, ३६.०७ कोटी रुपयांची ४२.३१ लाख लिटर दारू, २९.३६ कोटी रुपये किमतीचे १४,२२४ किलो अंमली पदार्थ, २०२.६२ कोटी किमतीचे १६,२५४ किलो मौल्यवान धातू, ६५.९७ कोटी किमतीचे मोफत आणि इतर वस्तू असे १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण ४०८.९१ कोटी रुपये किमतीची जप्ती करण्यात आली आहे. व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकांद्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.