पनवेल : तळोजा वसाहतीमध्ये नवी मुंबई पोलीसांनी दोन परदेशी नागरिकांकडून मेफेड्रोन, कोकेन असे साडेपाच कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. पोलीसांनी या प्रकरणी परदेशी नागरीक वास्तव्य करत असलेल्या घरमालकांवर सुद्धा कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली. नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची तळोजा हद्दीमध्ये कारवाई, ०२ नायजेरीयन आरोपींसह ५ कोटी ६२ लाख रूपयांचे “मेफेड्रॉन व कोकेन” हे अंमली पदार्थ जप्त, घरमालक देखील सह आरोपी. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस वेगवेगळे सापळे रचत आहेत. अंमलीपदार्थाचा व्यापार आणि सेवन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीसांकडून सातत्याने कारवाई होत आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना तळोजा येथे अंमलीपदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजातील धरणाकॅम्प या परिसरातील शिर्के बिल्डींग येथे पोलीसांनी सापळा रचल्यानंतर तेथे नायजेरीया देशातील व्यक्ती राहत असलेल्या घरामध्ये मेफेड्रॉन व कोकेन हे अंमल पदार्थ आढळले.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त भाउसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत नायडू, निलेश धुमाळ व इतर पोलीस कर्मचा-यांनी २५ वर्षीय ओनयेका हिलरी इलोडिन्सो याच्याकडून ५ कोटी ६२ लाख ७० हजार रुपयांचे २ किलो ४२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन आणि १७४ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ ताब्यात घेतले. तसेच ४० वर्षीय चिडीबेरे ख्रिस्तोफर मुओघालु या संशयीताकडून पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील राहत असताना पोलीसांना तेथे सापडला. पोलीसांनी या दोघांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून या संशयीतांवर एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (क), २२ (क) सह बी.एन.एस. कायदा २०२३ चे कलम २२१, २२४ सह परदेशी नागरीक कायदा १९४६ चे कलम १४ (क) व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट १९३९ चे कलम ५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. संशयीतांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने संशयीतांना पोलीस कोठडी सूनावली आहे. तसेच नायजेरीयन व्यक्ती राहत असलेल्या दोन्ही सदनिकांचे घरमालक रमेश पावशे व नामदेव ठाकुर यांच्यावर देखील या गुन्हयामध्ये संशयीत आरोपी असल्याची माहिती पोलीसांनी दिली. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण आपले घर भाडयाने देण्यापुर्वी भाडेकरूनची पार्श्वभुमी माहीती करून खात्री करूनच घर भाडयाने द्यावे. विशेषतः परकीय नागरीकांना घर भाडयाने देण्यापुर्वी त्यांचे पासपोर्ट व सी फॉर्म यांची खात्री करावी. कायदेशीर भाडेकरारनाम करावा. तसेच वेळोवेळी त्या ठिकाणी भेट देवुन आपल्या जागेचा बेकायदेशीर कामासाठी तर वापर होत नाही ना याची खात्री करावी. सदर ठिकाणी बेकायदेशीर कृत्य चालु असल्यास अशा गैरकृत्याची माहीती स्वतः पोलीसांना द्यावी.- गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई पोलीस – अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त,