मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस सुरुवात झाली. तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र ५ ची परीक्षा सकाळी सुरू झाली. पहिल्या दिवशी तब्बल ५४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, नवी मुंबईतील केएलई महाविद्यालयांनी २९ विद्यार्थ्यांचे व मुंबईतील लीलावती लालजी दयाल रात्र महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे दाखल करण्यात आले नव्हते. त्यामुळे ३७ विद्यार्थी परीक्षेला मुकले असते. मात्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यांना ऐनवेळेस क्रमांक देऊन परीक्षेस बसविले. दरम्यान, संबंधित दोन महाविद्यालयांवर विद्यापीठाने नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये नोंदवली गेली. त्यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही, हे तात्काळ विद्यापीठास समजले. दरम्यान, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, की हिवाळी परीक्षेत अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेवर दाखल करावेत. मूल्यांकनासाठी प्राध्यापक वर्ग तात्काळ उपलब्ध करावा. जेणेकरून परीक्षेचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येतील.