मुंबई : ‘आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांच्या हिताचे टेंडर आणू.’ असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘मुंबईला लुटायचे, मुंबईला भिकेला लावायचे कारस्थान आम्ही होऊ देणार नाही.’, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. धारावीमधील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहाला मिळाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने याला विरोध केला आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारच्या ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महा बिघडी सरकार फसव्या घोषणा करत आहे. या योजनांना बळी पडून जनता त्यांना मतदान करेल अशी त्यांची खोटी आशा आहे. त्यामुळेच लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांची घोषणा केली जात आहे. लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका उद्योगपती योजनावर आज बोलणार आहे. मागच्यावर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता. धारावीकरांना ५०० फुटांचे हल्लाचे घर तिथेच मिळाले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका कायम राहणार आहे.
धारावी अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘धारावी ही झोपडपट्टी नाही तर त्यामध्ये वेगळेपण आहे. धारावीतील प्रत्येक घरांमध्ये छोटे उद्योग धंदे चालतात. त्यांच काय करणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. बेसुमार टीडीआर काढून अदानीला द्यायचा डाव आम्ही उधळून लावणार आहोत. तो यशस्वी होऊन देणार नाही. हे सरकार कॉन्ट्रॅक्ट मित्राचं चांगभलं करत आहेत. मोदी आणि शहांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली. आता उद्या ते मुंबईचे नाव बदलून अदानी सिटी करतील. पण आम्ही ते होऊन देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चवळीचे उदाहण आहेच, मराठी माणूस मुंबई वाचवतो. मुंबई बचाव समिती वैगरे नाही तर मुंबई रक्षक समिती असले पाहिजे. मुंबईला लुटून भिकेला लावायचे काम याचे सुरू आहे पण ते आम्ही करून देणार नाही. अदानींना धारावी देण्याचा यांचा डाव उधळून लाऊ.’ धारावीकरांना हकलवून लावण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूवहात अडकवून हकलवून द्यायचे हा यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही एकाही धारावीकराला तिकडून जाऊन देणार नाही. आम्ही धारावीकरांसोबत आहोत. धारावीकरांना पात्र अपात्रेचा निकष लावून धारावी रिकामी करण्याचे याचे काम सुरू आहे. रिकामी केलेली धारावी अदानीच्या घश्यात अलगद जाईल, मग तिथे भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी हे तयार होतील. हे कारस्थान मुंबईचे नागरी संतुलन बिघडवण्यासाठीचा डाव आहे. मानसिक संतुलन बिघडलेली माणसं सर्वांना माहिती आहेत ते काय काय करतात. काही जणांच्या मानसिकतेला बुरशी आली आहे. तसंच, ‘धारावीचा आराखडा कोणाला माहित नाही. लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्ट्यांची जागा हे सरकार अधिग्रहण करत आहे. लाडका मित्र, लाडका भाऊ यासाठी हे सगळं सुरू आहे. धारावी टाऊंनशीपच्या आराखड्याचा कुठेही उल्लेख नाही. पण आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीकरांचं तिथेच पुनर्वसन करून देऊ. तसेच त्यांच्यासाठी नवीन इंडस्ट्रिअल इस्टेट बांधून देऊ. आम्ही मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही. गरज असेल तेव्हा आम्ही नवीन टेंडर काढू. धारावीचा विकास नेमका काय ते स्पष्ट करू, अदानीला झेपत नसेल तर टेंडर रद्द करा.’ असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.