मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याबाबत मोठी घोषणा करत २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणीत एनडीएच्या अखत्यारीतील सर्व २१ राज्यांमध्ये UCC लागू करण्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईत ‘सेवा संकल्प अभियान’च्या घोषणेप्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक राज्यांमध्ये UCC लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून उत्तराखंड, गुजरात आणि आसाममध्ये ती आधीच लागू करण्यात आली आहे, तर मध्य प्रदेशमध्ये मसुदा तयार करण्यासाठी समिती कार्यरत आहे. सध्या एनडीएची १९ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता असून उर्वरित राज्यांमध्येही हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा शाह यांनी केली. या अभियानात एनडीएतील सर्व घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार असून प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि प्रशासकीय स्तरावर विविध सेवा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
अमित शाह यांनी यावेळी देशातील बेकायदेशीर घुसखोरीविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्याचा पुनरुच्चार केला. प्रत्येक बेकायदेशीर घुसखोराची ओळख पटवून त्याला देशाबाहेर पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणी, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक कायदा रद्द करणे आणि नक्षलवादाविरोधातील कारवाई यांचा उल्लेख केला. २०१४ पूर्वी देशाच्या राजकारणावर भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाहीचे वर्चस्व होते, मात्र गेल्या १२ वर्षांत कामगिरीवर आधारित राजकारणाला चालना मिळाल्याचा दावा त्यांनी केला. भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा आधार ‘इंडिया फर्स्ट’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शाह यांनी लोकशाहीत मतभिन्नता स्वाभाविक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. भाजप संवाद आणि चर्चेवर विश्वास ठेवतो, आणीबाणी लादून कारभार करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे, आमची नाही, असेही त्यांनी म्हटले.





