जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषणावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे. गणपती आगमनानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते आंतरवाली सराटी येथून हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, दुसरा १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, तिसरा १७ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे आणि चौथा १८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे येथे असेल. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरांगे यांनी आंदोलन पूर्णपणे शांततेत करण्याचे आवाहन करत जाळपोळ, दगडफेक किंवा कोणत्याही हिंसक प्रकारापासून दूर राहण्याचे निर्देश समर्थकांना दिले आहेत.
जरांगे-पाटील यांनी मराठा समाजातील नोकरदार, व्यापारी, महिला, शेतकरी आणि युवकांना आंदोलनात आपल्या क्षमतेनुसार सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईपर्यंत येणे शक्य नसलेल्यांनी मार्गात येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, तर सहभागी होऊ न शकणाऱ्यांनी मोर्चासाठी वाहने उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने मोर्चाला अडथळा आणण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभार मानत, सरकारने न्याय दिला नसला तरी न्यायव्यवस्थेने दिला असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची ताकद ओळखतात आणि मोर्चा रोखणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांनी अडवले तरी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करू नये, शांततेने ठिय्या आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, आंदोलकांवर बळाचा वापर होऊन रक्त सांडल्यास राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, महिलांनी आझाद मैदानाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना हळदी-कुंकू देऊन मराठा आरक्षणाची मागणी करावी, असेही त्यांनी सुचवले. भाषणादरम्यान त्यांनी काही मंत्र्यांवर टीका करत आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले.






