कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये पोलीस उपायुक्तांंच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसापूर्वी सहा किलो वजनाचे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये गांजा आणि मेफोड्रेन पावडरचा समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन रिक्षा चालकांना अटक केली आहे. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
अब्दुल रहमान कुर्बान अली शेख (२४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो रिक्षा चालक आहे. तो कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहतो. विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक ठाकुर्ली ९० फुटी रस्ता कचोरे भागात मंगळवारी गस्त घालत होते. त्यांना अब्दुल शेख हा आपल्या रिक्षेत काही संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षेची झडती घेतली. रिक्षेमध्ये ४४ हजार रूपये किमतीची मेफोड्रेन पावडर आढळून आली. या अंमली पदार्थाचे सेवन केल्याने मेंदुवर विपरित परिणाम होतो. हा प्रतिबंधित पदार्थ अब्दुल जवळ बाळगून त्याची तस्करी करत असल्याचे पोलिसांना आढळले. हा पदार्थ कोठून आणला आहे. तो कोणाला विक्री करणार होता, याची माहिती अब्दुल पोलिसांना देऊ शकला नाही. पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली.







