कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशाला लुटणाऱ्या चार जणांपैकी दोन आरोपींना पकडण्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गुरूवारी यश आले. या चोरट्यांकडून कल्याण रेल्वे स्थानक भागात यापूर्वी घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.काजोल पाटील, मायकेल शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्याच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशात राहणारे संतोष केसरी गावी जाण्यासाठी मंगळवारी कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. भूक लागल्याने ते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पदपथावर वडापाव किंवा इतर काही खाण्यास मिळते का ते पाहण्यास गेले होते. रेल्वे स्थानक भागात फिरत असताना त्यांना स्कायवाॅकखाली चार जण भेटले. त्यांनी संतोषला कुठे चालला आहेस, अशी विचारणा केली. त्याला जबरदस्तीने अंधार भागात नेले.
तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्याच्या जवळील १८ हजार रूपयांची रोकड लुटून पळ काढला. चोरट्यांमध्ये दोन महिला, दोन पुरूषांचा समावेश होता. गावी नेण्यासाठी जमविलेली पुंजी चोरट्यांनी लुटली होती. याशिवाय संतोषला धारदार शस्त्राने जखमी केले होते. याप्रकरणी संतोषने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही तपासून त्याद्वारे चौघांची ओळख पटवली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानक भागातून सापळा लावून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.