मुंबई : दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींना ‘ओटीपी’ची माहिती दिली नसतानाही क्रेडिट कार्डमधून परस्पर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. सप्टेंबरपर्यंत सायबर फसवणुकीतून पैशाचा अपहाराच्या ८८७ तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. मात्र, अशा प्रकरणात उकल होण्याचे प्रमाण केवळ आठ टक्के आहे.
सणासुदीचे दिवस असल्यामुळे सायबर फसवणूक करणारे विविध सूट अथवा विविध ऑफर्सच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येत आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये क्रेडिट कार्डच्या केवायसीच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येत आहेत. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइलचा ‘रिमोट ॲक्सेस’ आरोपींना मिळतो. त्यामुळे आपल्या मोबाइलमध्ये होणारे व्यवहार मोबाइल स्क्रीनद्वारे आरोपींना समजतात. तसेच संदेशाद्वारे आलेले ओटीपीही आरोपी पाहू शकतात. त्यामुळे ओटीपीविषयी माहिती आरोपींना न देता अनेकांच्या क्रेडिट कार्डमधून व्यवहार होत आहेत.
सप्टेंबर महिन्यापर्यंत क्रेडिटकार्ड फसवणूकीचे ८८७ गुन्हे मुंबईत घडले आहेत. दहिसर पोलिसांनी नुकतीच एका प्रकरणात १०० टक्के रक्कम परत मिळवून दिली. मात्र गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण आठ टक्के आहे. त्याप्रकरणामध्ये आतापर्यंत १३८ व्यक्तींना अटक झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सायबर पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार करावी, असे या अधिकाऱ्याने सांगितले.