वृत्तसंस्था : हार मानायची नाही” हीच जिद्द उराशी बाळगून सरफराज खान मैदानात उतरतो, आणि टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सरफराजने २०२५ वर्षाचा शेवट त्याच्या नवी केला. त्याने प्रचंड बोलबाला गाजवेल अशा खेळीने शेवट केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ३१ डिसेंबर रोजी गोव्याविरुद्ध खेळताना त्याने फलंदाजीचा अक्षरशः कहर केला. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराजने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. मैदानाच्या चारही बाजूंनी फटके मारत त्याने गोव्याच्या गोलंदाजांना सावरायची संधीच दिली नाही.
सरफराजने केवळ ५६ चेंडूंमध्ये शतक झळकावून सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने वळवला. शतकानंतर तर तो आणखीनच धोकादायक झाला. पुढील १९ चेंडूंमध्ये त्याने तब्बल ५७ धावा ठोकल्या आणि अवघ्या ७५ चेंडूंमध्ये १७५ धावांची विस्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने अफाट स्ट्राइक रेटने फलंदाजी करत १४ षटकार आणि ९ चौकारांची आतषबाजी केली. या कामगिरीसह सरफराजने मुंबईकडून लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, पण सरफराजने तो पूर्णपणे मागे टाकला. या सामन्यात फक्त सरफराजच नव्हे, तर त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान यानेही शानदार फलंदाजी केली. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना मुशीरने ६६ चेंडूंमध्ये ६० धावांची संयमी पण प्रभावी खेळी केली. दोन्ही भावंडांच्या धावा एकत्र केल्यास तब्बल २१७ धावा झाल्या, आणि या दोघांनी मिळून १६ षटकार व १४ चौकार ठोकत गोव्याच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. या जोरदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने ५० षटकांत तब्बल ४४४ धावांचा डोंगर उभा केला आणि सामना पूर्णपणे एकतर्फी केला.







