मुंबई : राज्यातील नामांकित साखळी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात तपासणी मोहिमेला वेग आला असून, मंगळवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या एकूण पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या तीन केंद्रांसह भांडुपमधील दोन लोकप्रिय धाब्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय दोन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, तब्बल ९५ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना स्वच्छता व अन्न सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. एफडीएच्या तपासणीदरम्यान विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील आर सिटी मॉलमधील ज्युबिलन्ट फूड वर्क्सच्या डॉमिनोज पिझ्झा केंद्रांची तसेच सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील डॉमिनोज पिझ्झा आणि सफायर फूड इंडियाच्या केंद्रांची तपासणी करण्यात आली. संबंधित केंद्रांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, २०११ मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीत आढळल्याने परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या तपासणीत अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटेशनचा अभाव आढळून आला. काही ठिकाणी फ्रोझन अन्नपदार्थांची योग्य तापमान न राखता साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच, आस्थापनांचा एफएसएसएआय परवाना दर्शनी भागात लावण्यात आलेला नसल्याचेही आढळले. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कीटक नियंत्रण व्यवस्थेतही गंभीर त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे न ठेवता एकत्र साठवले जात असल्याचे समोर आले. अशा प्रकारच्या त्रुटींमुळे अन्न दूषित होण्याचा आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे एफडीएने संबंधित आस्थापनांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईनंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत आस्थापनांना स्पष्ट इशारा दिला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ, अस्वच्छता किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एफडीएच्या या विशेष मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत अधिक गांभीर्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
परवाने निलंबित झालेले डॉमिनोजचे आउटलेट्स:
अस्वच्छता, कीटक नियंत्रण (Pest Control) चा अभाव आणि अन्न साठवणुकीतील त्रुटींमुळे खालील मुंबईतील ३ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे:
- विलेपार्ले वेस्ट
- बोरिवली वेस्ट
- घाटकोपर वेस्ट – आर-सिटी मॉल






