नवी मुंबई : नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी १ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून २५७ मद्यपींचालकांची धरपकड केली आहे. मद्यपीं वाहनचालकांकडून होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा हकनाक बळी जातो.
याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमित ड्रंक ऍन्ड ड्राईव्हची मोहीम राबवण्यात येते. मात्र त्यानंतरही मद्यपींकडून वाहन चालवण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, तुर्भे, सीवुडस्, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल व इतर अशा एकूण १६ वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये मोहीम राबवण्यात आली. वाहनचालकांनी मद्यसेवन न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.