नवी मुंबई : ऑनलाईन ट्रेडिंग करून चांगला परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर टोळीने नवीन पनवेल येथील महिलेची एक कोटी ९२ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह अपहार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ४० वर्षीय ही महिला नवीन पनवेल भागात राहते. तिचा पती ‘बीएआरसी’त नोकरीला आहे. डिसेंबरमध्ये या महिलेचा पती आपला मोबाईल फोन घरी ठेवून गेला होता. तेव्हा पतीच्या व्हॉट्सॲपवर सायबर टोळीतील रीतू व्होरा नामक महिलेने लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सुचवले होते. त्यानंतर या महिलेला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समावेश केला. या ग्रुपमध्ये इंदिरा सिक्युरिटी प्रा. लि. या कंपनीच्या वतीने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात येत असून नुकसान झाल्यास ते भरून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. गुंतवणुकीची तयारी दाखवताच सायबर टोळीतील रितू व्होरा हिने ‘व्हीआयपी नरेंद्र’ हा दुसरा ग्रुप तयार करून एका फॉर्मद्वारे संपूर्ण माहिती भरून घेऊन तिला मेंबरशीप दिल्याचे सांगितले. त्यानंतर लिंकवरून इंदिरा सेक्युरिटी नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेने काही शेअर्सची निवड केली, तसेच रितू व्होरा हिने दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवले. या महिलेने १६ जानेवारीपर्यंत ६० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यावर जवळपास १२ लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे तिच्या ॲपमध्ये दिसत होते.
महिलेने त्यातील ५० लाखांची रक्कम काढून घेतली. मात्र, तिने अधिक नफा मिळावा, यासाठी पुन्हा ही रक्कम ॲपद्वारे गुंतवली. त्यानंतर या महिलेने सायबर टोळीने दिलेल्या विविध बँक खात्यांत तब्बल एक कोटी ९२ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम गुंतवली. महिलेने सायबर टोळीने दिलेल्या ॲपमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघालेच नाहीत. त्यामुळे या महिलेने रितू व्होरा हिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचे सर्व नंबर बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने आपल्या पतीसह नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.