ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशातून पालिका प्रशासन दोन ठिकाणी नवीन वाहनतळ उभारणार असून त्याचा सविस्तर आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यानुसार दोन्ही वाहनतळांमध्ये ६२८ चारचाकी तर, ४१८ दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. ही दोन्ही वाहनतळे येत्या दीड वर्षात उभारण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यादृष्टीकोनातून प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानक बरोबरच मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन आणि बाजरपेठही आहे. या भागात पुरेशा वाहनतळांची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजुला बेकायदा वाहने उभी केली जातात. या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी वाहनतळ उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच गावदेवी मैदानात भुमिगत वाहनतळाची उभारणी करून ते नागरिकांसाठी खुले केले आहे. याशिवाय, गावदेवी भाजी मंडईतही पालिकेने वाहनतळ उभारलेले आहे. त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनतळ उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाशेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जागेत तसेच नौपाडा येथील शाहु मार्केट इमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे आरखडेही पालिकेने तयार केले आहेत.
गडकरी रंगायतन शेजारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची २४०० चौ.मी इतकी जागा आहे. याठिकाणी ४२०० चौ.मीचे बांधकाम करून वाहनतळाची निर्मीती केली जाणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजुर केला आहे. याठिकाणी ३०८ चारचाकी तर, १७१ दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच शाहू मार्केटच्या जागेवर पाच मजली आणि १६ मजली इमारत उभारली जाणार आहे. यातील पाच मजली इमारतीतील तळ मजले दोन असणार आहेत. त्यात २४७ दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तीन मजले गाळे धारकांना दिले जाणार आहेत तर, चौथा आणि पाचवा मजल्यावर पालिकेचे कार्यालय उभारले जाणार आहे. त्याशेजारीच ३२० चारचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी २० कोटींचा निधी मंजुर झाला आहे. उर्वरित ५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालिकेने राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.