मुंबई : गोरेगाव येथीस व्यावसायिकाचे अपहरण आणि धमकी प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. वनराई पोलिसांनी एफआयआरमधील मुख्य आरोपी आदिशक्ती प्रायव्हेट लिमिटेडचा मनोज मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक केली. मिश्रासोबत विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपानुसार, मिश्रा याने म्युझिक कंपनीचे सीईओ राज कुमार सिंह यांचे अपहरण करण्यासाठी आमदार पुत्र राज सुर्वे याला कथित “ठेका” दिला होता. मिश्रा याच्या कंपनीने सिंग यांच्या कंपनीकडून ८ कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज काढायचे होते म्हणून त्याने राज सुर्वे यांच्याशी संपर्क साधून बंदुकीच्या जोरावर कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेतली होती.
मुख्य आरोपी मनोज मिश्रा याने व्यावसायिक राजकुमार सिंग यांच्याकडून २०२१ मध्ये पाच वर्षाच्या करारावर यूट्युब चॅनेलच्या डेव्हलपमेंटसाठी ८ कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र ज्या कामासाठी कर्ज घेतले होते, त्यासाठी न वापरता त्याने दुसऱ्या कामासाठी त्या पैशांचा वापर केला. यामुळे सिंग यांच्या कंपनीला फारसा नफा होत नव्हता. यामुळे त्यांनी चॅनेलच्या कंटेटकडे लक्ष देण्यास मिश्राला सांगितले. यासाठी मिश्राने आणखी पैशांची मागणी केली. मात्र सिंग यांनी पैसे देण्यास नकार दिला. मग २०२२ पासून मिश्रा करार रद्द करण्यासाठी दबाव टाकत होता.
शेवटी रात्री तो आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे, विकी शेट्टी आणि अन्य १० ते १५ जणांचे टोळके घेऊनस सिंग यांच्या ऑफिसलमध्ये आला आणि त्यांना बळजबरीने घेऊन गेला. यानंतर राज सुर्वे, मनोज मिश्रा, विकी शेट्टी यांनी अन्य साथीदारांसह बंदुकीचा धाक दाखवून सिंग यांच्याकडून बळजबरीने करार संपल्याचे लिहून घेतले. तसेच कुणाला काही सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यानंतर सिंग यांच्या फिर्यादीवरुन सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्याला अटक केली.