पुणे : महिलांकडील दागिने तसेच पादचाऱ्यांकडील मोबाइल आणि पीएमपीत दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जंगली महाराज मंदिरासमोर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. भरवर्दळीचा असणारा हा रस्ता, मात्र चोरट्यांनी धाडस करून दागिने हिसकावत धूम ठोकली आहे. दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला सहकारनगर भागात राहायला आहेत. श्री जंगली महाराज मंदिरात वार्षिक उत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तक्रारदार महिला एका भजनी मंडळात आहेत. बुधवारी (९ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास त्या भजन करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या. भजन करून त्या पुन्हा बाहेर येत होत्या. दरम्यान त्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत. रस्त्यावर होणारे लुटमारीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कॉप २४’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. दिवसा, तसेच रात्री गस्त घालण्यात येत असली तरी, शहरात लुटमारीच्या घटना सुरूच आहेत.







