पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आंबेगाव, विश्रांतवाडी, बाणेर तसेच समर्थ परिसरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.
आंबेगाव बुद्रुक येथील एकाच इमारतीतील तीन फ्लॅट फोडण्यात आले आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत आमोद परांजपे (वय ४३) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास घडली. तक्रारदार साईदत्त निवास टेल्को कॉलनीत तक्रारदार राहतात. परांजपे कुटुंबिय ८ एप्रिलला रात्री घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते नऊ एप्रिलला सकाळी परतले. त्यावेळी घरफोडीचा प्रकार समोर आला. त्यांनी घरात तपासणी केली असता, ६५ हजार रुपयांची रोकड आणि एक लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. दरम्यान, याच इमारतीतीत अन्य दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्यातील एक फ्लॅटधारक ऑस्ट्रेलियात होते. त्यांच्या घराचा दरवाजा काहींना उघडा दिसल्याने आत पाहिल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील समर्थ कॉलनीत ज्येष्ठ नागरिकाचे घर फोडले आहे. येथून ८ हजार रुपये व चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना घडली. बाणेर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. ज्येष्ठ नागरिक धार्मिक कार्यासाठी त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्या वेळी हा प्रकार घडला. विश्रांतवाडी येथील मोर्य गार्डनजवळील यशश्री अपार्टमेंटमध्येही घरफोडी झाली. येथून चांदीचे दागिने व रोकड असा ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच नाना पेठेतील चंदन सुपर मार्केट हे दुकान चोरट्यांनी फोडल्याचे गुरूवारी समोर आले. याप्रकरणी समर्थ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ५१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. समोर सुपर मार्केट व पाठिमागे घर असे हे दुकान आणि घर एकत्रित आहे. चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश करून ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.





