अहमदनगर : शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त काढलेल्या दौऱ्यापाठोपाठ भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आता ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांच्या मागण्यांसाठी कंबर कसली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात झालेल्या वेतनवाढीच्या करारावर कार्यवाही झालेली नाही. करारानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेत नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
३० सप्टेंबर रोजी मुंबईत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. आमदार मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडलेल्या या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांची सरकारकडून पूर्णता होईपर्यंत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी देखील या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डी तालुक्यात जवळपास पन्नास हजार ऊसतोड मजूर असून त्यांचाही या संपाला पाठिंबा आहे. यामुळे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकील महत्व् आहे.