नाशिक : इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान व न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य इंग्रज सत्तेला जसे देशातून हाकलून लावले तसेच संविधान, लोकशाही संपवणारे देशातील भाजपाचे लुटारू हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेस पक्षाचे उदिष्ट आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांची आढावा बैठक नाशिक मध्ये घेण्यात आला. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर शिबिराची अंमलबजावणी करणे तसेच पक्ष संघटना जिल्हा, ब्लॉक, मंडल स्तरापर्यंत मजबूत करुन विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशातील वातावरण बदललेले असून राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच देशाला तारु शकते हा जनतेला विश्वास आहे. राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशसह पाचही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचेच सरकार सत्तेत येणार हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे, असेही ते म्हणाले.