मुंबई : दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तक्रारदार पोलीस हवालदार कुंडलिक धिघे मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मालवणी गाव परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची तक्रार मालवणी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन गटांमध्ये मारामारी सुरू होती.
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या व्यक्तींना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील सूरज नावाच्या व्यक्तीने पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यावेळी एका अनोळखी महिलेनेही पोलिसांना मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या इतर पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सूरज प्रसाद, यास्मिन प्रसाद, राज कशाळकर, योगेश कशाळकर व योजना कशाळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या पाच जणांना अटक करण्यात आली.