पुणे : निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेश वसंतराव कारंडे (वय ७५), लिना राजेश कारंडे, अपर्णा निलेश कारंडे, लता वसंतराव कारांडे (सर्व रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी कास फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्याने वेळोवेळी आरोपींना एक कोटी ५५ लाख रुपये दिले. आरोपींनी त्यांना कंपनीतील समभागांचे प्रमाणपत्र दिले होते. आरोपींनी करारनामा केला. आरोपींनी कराराचा भंग करुन पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जानकर तपास करत आहेत.