वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९६वी जयंती असून महाराष्ट्रच नाही तर जगभरातील शिवप्रेमींकडून मोठ्या उत्साहात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजन्मभूमी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या जन्मसोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी रितेश देशमुखही उपस्थित होता. राज्यातही किल्ले रायगड, कोल्हापूर, नागपुरसहीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवरायांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांवरही मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हाताचा ठास (हाताचा ठसा) आणि डाव्या पायाचा ठसा आहे. हे दोन्ही ठसे दगडात कोरलेले आहेत. हे दोन ठसे किल्ल्यावरील छोट्या देवळ्यांमध्ये आहेत. महाद्वारपासून उजव्या बाजूच्या तटबंदीवर या छोट्या देवळ्या आहेत. किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांनी ओल्या दगडावर हात-पाय ठेवला आणि गवंड्याने तो तसाच ठेवला, असं या ठशांबद्दल बोलताना स्थानिक लोक सांगतात. याशिवाय किल्ल्यात श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. हे शिवरायांना समर्पित महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. हे राजाराम महाराजांच्या काळात १६९५ साली बांधलेलं आहे.







