पुणे : गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच घामाघूम होत आहे. उकाड्यामुळे घशाला सारखी कोरड पडत आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यांतील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. असह्य करणारा उन्हाचा चटका उष्माघात ठरू शकतो. त्यामुळे काम असेल तर घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
सध्या हवामानात मोठे बदल होत असून गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कमी पाऊस, कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे कमाल तापमान वाढत आहे.
त्यातच वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून उत्तर केरळपर्यंत, मध्य महाराष्ट्र कर्नाटकावरून जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोकण- गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे. पुणे शहरातील तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत उन्हाचा चटका अधिक जाणवेल. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असा सल्ला नागरिकांना देण्यात आलाय. दरम्यान, एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानंतर राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, कमाल तापमान वाढणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.