ठाणे : कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या आंबिवली मानिवली येथील भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. या प्रकल्पासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही या विरोधाला न जुमानता रेल्वेने भूसंपादन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला. यानंतर ज्या शेतक-यांचा सर्व्हेक्षणस विरोध आहे त्या शेतक-यांच्या जमिनी वगळून उर्वरित जमिनीची मोजणी करण्याचा सुवर्णमध्य पोलिसांनी काढला. तरी या शेतक-यांची रेल्वे प्रशासनाकडून कशा प्रकारे समजूत काढली जाणार यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. कल्याण मुरबाड रेल्वेच्या प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून आता लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या काळात रेल्वेकडून या जमिनीचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. उल्हास नदी किनारच्या सरकारी जागेतून रेल्वे मार्गिका बनविणे शक्य असतानाही शेतक-यांच्या घरादारावर नांगर फिरविण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करु लागले आहेत.
रेल्वेच्या या प्रकल्पात मानिवली मधील १९७० गुंठे भूखंड बाधित होत असून यात २० घरे, अडीच हजार फळझाडे आणि ३ ते साडे तीन हजार जंगली झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे आमच्या जमिनीवरून रेल्वे नको अशी स्थानिक नागरिकाची भूमिका आहे. या जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांनी आपला लेखी विरोध भूसंपादन विभागासह संबधित यंत्रणाकडे नोंदवला आहे. मात्र शेतक-यांच्या विरोध दुर्लक्षित करून रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता शुभांगी पाटील यांनी त्यांचे पथक सर्व्हेक्षणासाठी मानिवली परिसरात दाखल केले. या वेळी स्थानीक शेतकऱ्यांनी या पथकाला गराडा घालत विरोध केला. यामुळे स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांची भूमिका विचारली असता काही शेतकऱ्यांनी आपला विरोध नसून आपण रेल्वेला भूखंड देण्यास तयार असल्याचे सांगितले तर काही शेतकऱ्यांनी विरोध केला. यानंतर पोलिसांनी सुर्वण मध्य काढताना जे शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार आहेत त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करून त्याचा मोबदला रेल्वेने निश्चित करावा उर्वरित शेतक-यांशी प्रथम चर्चा करून तोडगा काढावा त्यानंतरच सर्व्हेक्षण केले जावे अशा सूचना रेल्वेच्या अधिका-यांना केल्यानंतर रेल्वेकडून निम्म्या जमिनीचा सर्व्हे करण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून उर्वरित शेतक-यांची कशाप्रकारे समज घातली जाते? या शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यास न्यायालय त्यावर काय निर्णय देते यावर कल्याण मुरबाड रेल्वेच्या कामाचा वेग अवलंबून असणार आहे. यामुळे या शेतक-यांची रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर मनधरणी करण्या बरोबरच जिथे शक्य आहे तिथे नदी किनारी मोकळ्या भूखंडाचे संपादन करून शेतकर्याच्या जमिनी बाधीत न करता हा प्रकल्प मार्गी लावला जावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.