पिंपरी : आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून तीन भोंदू साधूंनी युवकाच्या हातातील चोवीस हजार रुपये किंमतीची अंगठी लांबविली. ही घटना दिघीत घडली. याप्रकरणी कुमार पंडीत पवार (वय ३२, रा. हांडेवाडी, हडपसर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन नागासाधू विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुमार पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतात. कंपनीच्या कामानिमित्त गुरुवारी दिघीत आले होते. तीन साधूंनी फिर्यादी कुमार यांना भंडारा व आशीर्वाद देण्याचा बहाणा केला. त्यांना बोलण्यात गुंतविले. नजर चुकवून हातातील चोवीस हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेऊन फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.