मुंबई : प्रभू श्री रामाची महती विद्यार्थ्यांना व्हावी आणि प्रभू श्री रामाचा आर्दश विद्यार्थ्यांपुढे असावा त्याचा विध्यार्थ्यांच्या जीवनात उपयोग व्हावा याकरीता पालिकेच्या शाळांमध्ये १ ते १५ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धा आयोजित कराव्या असे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका शिक्षण विभागाला दिले आहेत. प्रभू श्रीराम या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात अयोध्येतील राम मंदीर लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्रभू रामाची प्रतिष्ठापना येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत होत आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा राजकीय उत्सव असणार आहे. याचे निमित्त साधत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून त्यांनी तसे निर्देश दिले आहेत. या पत्रात पालकमंत्री यांनी म्हटले आहे की, प्रभू श्री राम हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत. श्रीराम आदर्श पुत्र होते.
रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते . श्री राम हे उत्तम सुशासक ही होते त्यामुळे अजूनही चांगल्या सुशासनाची उपमा देताना ” राम राज्य” असे म्हणतात. त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे ही म्हटले जाते. प्रभू श्री रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून महानगर पालिकेच्या शाळांमधून दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान “निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , कविता लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात यावी असे निर्देश लोढा यांनी पालिका शिक्षण विभागाला दिले आहेत. जेणेकरून पुढील पिढीला श्री रामांच्या आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल तसेच सुशासन कौशल्याबद्दल ज्ञान मिळेल. प्रभू श्री रामाचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे असावा, त्याचा विध्यार्थ्यांच्या जीवनात उपयोग व्हावा म्हणून अश्या स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश श्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.त्या बाबतचे पत्र त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त आणि शिक्षण अधिकारी यांना दिले आहेत.