मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत ७ मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय सेवेतील पदांच्या भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. यासह अनेक महत्त्वाचेदेखील निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एका प्रकल्प सूचवला होता. तो प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत महत्त्वाची विनंती केली होती. आशा भोसले यांनी १९ ऑक्टोबर २०२५ मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवलं होतं. या पत्रात मुंबईत संगीत अकादमी उभारण्यासाठी किमान २००० चौरस मीटर जागा देण्याची विनंती केली होती. नवोदीत गायक-गायिकांना व्यासपीठ मिळवून देणं आणि संगीत शिक्षणाचा प्रसार करणे यासाठी त्यांनी विनंती केली होती. आशा भोसले यांचं काल निधन झालं. त्यामुळे आशा भोसले यांची मुंबईत संगीत अकादमी सुरु करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. ही इच्छा आपण पूर्ण करु, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “आशा भोसले यांच्या दुखद निधनाने आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशाताईंनी मुख्यमंत्र्यांना एक प्रकल्प सुरु करण्याची विनंती केली होती. तो प्रकल्प पुढे नेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.







