पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सामान्यांकडून अतिरीक्त शुल्क वसूल केले जाते. या भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी सामान्य नागरिकांकडून केल्यानंतर पनवेल आरटीओ विभागाच्या कारभारात काहीच सुधारणा होत नव्हती. अखेर ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तीन दिवसांपूर्वी (२४ नोव्हेंबर) सापळा रचून दुपारी एका आरटीओ एजंटला कळंबोली आरटीओ कार्यालयाखाली रंगेहाथ दुचाकी चालविण्याचा वाहन परवानासाठी १५०० रुपयांची लाच घेताना अटक केली. या एजंटचे नाव भुषण कदम असे आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाला तीन दिवस उलटले तरी अद्याप कोणत्याही आरटीओ अधिका-याचे नाव तपासात समोर आले नाही.
३१ वर्षीय तरुणाने याबाबत रितसर ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिल्यावर ही कारवाई करण्यात आली. दुचाकी चालविण्याचा तात्पुरता (लर्निंग) परवाना २०० रुपये शासकीय शुल्क तसेच पक्के परवाना काढण्यासाठी ९०० रुपये शासकीय शुल्क असताना कदम याने २५०० रुपयांपैकी १५०० रुपये स्विकारल्याने पोलीसांनी कदम याला आरटीओ कार्यालयाखालील एजंटच्या दूकानातून अटक केली. एजंट कदम याने तक्रारदार तरुणाची वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाईन परिक्षा त्याच्या कार्यालयात घेतली. ही परिक्षा दिल्यानंतर तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हफ्ता म्हणून १५०० रुपये स्विकारल्यावर पोलीसांनी कदम याला ताब्यात घेतले.