ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरून मुख्य आरोपींना अटक केली असून, तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करणारा मुख्य शूटर दुसरा कोणी नसून, त्यांच्या घराजवळील वडापावच्या गाडीवर काम करणारा तरुण असल्याचे तपासात उघड झाले आहे. निखिल यादव असे या आरोपीचे नाव असून, तो मनोरमानगर परिसरातील एका वडापावच्या गाडीवर काम करत होता. या ठिकाणी काम करत असताना त्याने पूर्णेकर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. कोणालाही संशय येऊ नये यासाठी तो सामान्यपणे वावरत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या निखिल यादव आणि त्याचा साथीदार नितेश पवार उर्फ ‘भावड्या’ यांना ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरील एका डेअरीमधून ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी सुरू असून, हत्येचा कट कोणी रचला, यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, पूर्णेकर यांचा जवळचा मित्र पप्पू शिंदे याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. हल्ल्याच्या वेळी पप्पू शिंदे कार्यालयात उपस्थित होता. त्यानेच हल्लेखोरांना पूर्णेकर यांची ओळख पटवून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुख्य आरोपी निखिल यादव हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याचा या गुन्ह्यासाठी वापर करण्यात आला का, त्याला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कोणी दिले, तसेच या हत्येसाठी आर्थिक व्यवहार किंवा सुपारी देण्यात आली होती का, याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील कार्यालयात हेल्मेट घालून आलेल्या हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ठाण्यात खळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून, अंतर्गत वाद आणि पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्येमागील संपूर्ण कट, त्यातील इतर आरोपी आणि कारणांचा तपास अद्याप सुरू आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जात असून, लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.





