वृत्तसंस्था : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त काही महिन्यांपूर्वी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एका खास पोस्टद्वारे आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून, ‘आदि अनंत’ या चित्रपटातून नात्यांमधील प्रेम, सहवास आणि भावनांची हळवी गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसून येते. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेले दृश्य परस्परांमधील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची भावना व्यक्त करते. त्यामुळे ‘आदि अनंत’ नेमक्या कोणत्या नात्याची गोष्ट सांगणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून, कथा आणि पटकथा संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिली आहे. दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितले की, नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही व्यक्त होत असते. मोठ्या घटनांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांमध्ये नात्यांची खरी किंमत जाणवते आणि हेच भावविश्व चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसे जवळ असूनही त्यांच्यातील भावनिक अंतर वाढत असल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत आपल्या माणसांचा सहवास, प्रेम आणि जिव्हाळा किती महत्त्वाचा असतो, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या स्वरूपात दिसणारी नात्यांची ऊब, आठवणी आणि भावनिक बंध हे या चित्रपटाचे मुख्य केंद्र असणार आहे. या चित्रपटात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत वैदेही परशुरामी, सखी गोखले, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरू ठाकूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संकर्षण कऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, ‘आदि अनंत’ हा प्रत्येकाने आयुष्यात अनुभवलेल्या नात्यांवर आधारित चित्रपट आहे. त्यांनी लिहिले की, नात्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ‘सहवास’, तर सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ‘पश्चात्ताप’. आपल्या माणसांच्या कुशीत डोके ठेवून शांत पडण्यासारखे दुसरे ध्यान नाही आणि प्रेमाच्या मिठीने शांत न होणारी कोणतीही पिढी नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संकर्षण यांनी सांगितले की, त्यांनी लिहिलेली कथा अशोक सराफ यांना वाचून दाखवली आणि त्यांनी लगेच चित्रपटासाठी होकार दिला, हे आपले मोठे भाग्य असल्याचे त्यांनी म्हटले. वयाच्या ७९ व्या वर्षीही अशोक सराफ यांची कामाची ओढ, वेळेची शिस्त आणि विनोदाचे अचूक टायमिंग शिकण्यासारखे असल्याचेही संकर्षण यांनी नमूद केले.





