ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १२३ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच, त्यापाठोपाठ आता १५ व्या वित्त आयोगातून १८० विद्युत वातानुकूलीत बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत. त्यापैकी ८६ बसगाड्यांबरोबरच केंद्र शासनाच्या पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत १०० अशा एकूण १८६ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या वर्षभरात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येतो. या उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ४०० बसगाड्या आहेत. पैकी ३६० बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. प्रवाशी संख्येच्या तुलनेत या बसगाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणपुरक विद्युत बसगाड्यांची खरेदी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून पालिकेला एकूण ३०३ विद्युत बसगाड्या उपलब्ध होणार असून त्यापैकी १२३ बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. उर्वरीत १८० बसगाड्या पुढील तीन वर्षात परिवहन उपक्रमाला मिळणार असून त्यापैकी ८६ बसगाड्या पुढील वर्षी तर, ९४ बसगाड्या दोन वर्षानी मिळणार आहेत. या बसगाड्या जीसीसी तत्वावर चालविण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने १८० बसगाड्यांच्या संचलनासाठी निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बसगाड्या उपलब्ध झाल्यानंतर त्या प्रवासी सुविधेसाठी लगेचच उपलब्ध व्हाव्यात यासाठी परिवहन उपक्रमाने ही सर्व प्रक्रिया आधीच पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत ठाणे महापालिकेस १०० विद्युत बसगाड्या वर्षभरात उपलब्ध होणार आहेत. या बसगाड्यांकरिता कोलशेत परिसरात आगार तयार करण्यात येणार असून या कामासाठी केंद्र सरकारने निधी देऊ केला आहे. या कामाची निविदा पालिकेने काढली आहे. ठेकेदार निश्चित करून वर्षभरात आगार तयार करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. एकूणच वर्षभरात एकूण १८६ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या वर्षभरात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. ठाणे परिवहन उपक्रमाला १५ व्या वित्त आयोगातून एकूण ३०३ वातानुकूलीत विद्युत बसगाड्या उपलब्ध होणार आहेत. पैकी १२३ बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. ८६ बसगाड्यांच्या खरेदीसाठी निधी मिळाला असून यामुळे वर्षभरात या बसगाड्या उपलब्ध होतील. उर्वरित ९४ बसगाड्या पुढील दोन वर्षात उपलब्ध होतील. तसेच पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या वर्षभरात टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात टिएमटीच्या ताफ्यातील विद्युत बसगाड्यांची संख्या ४०३ इतकी होणार आहे, अशी माहीती ठाणे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.