वृत्तसंस्था : भारत विरुद्ध नेदरलँड (IND VS NED) यांच्यात टी २० वर्ल्ड कपमधील ग्रुप ए चा शेवटचा सामना बुधवारी पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडवर १७ धावांनी विजय मिळवून टी २० वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकलेत. टीम इंडियाने (Team India) यापूर्वी यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि आता नेदरलँड अशा चार संघांचा पराभव केलाय. त्यानंतर आता टीम इंडिया रविवार पासून सुपर ८ फेरीतील सामने खेळणार आहे. या फेरीत टीम इंडियाचा पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे.
या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फलंदाजी निवडली आणि भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून ६ विकेट गमावून १९३ धावा केल्या. यावेळी शिवम दुबेने सर्वाधिक ६६, हार्दिक पंड्याने ३०, सूर्यकुमार यादवने ३४ तर तिलक वर्माने ३१ धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी नेदरलँडला १९४ धावांचे आव्हान दिले. विजयाचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या नेदरलँडची सुरुवात चांगली झाली. यात जवळपास सर्व फलंदाजांनी दोन अंकी धावसंख्या केल्या, मात्र कोणीही मोठी कामगिरी करू शकलं नाही. नेदरलँडकडून सर्वाधिक धावा या बास डी लीडे ३३, झॅक लायन-कॅशेने २६, नोहा क्रोएसने २५ धावा केल्या. नेदरलँडच्या संघाने विजयाचं आव्हान करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखलं. यात भारतीय गोलंदाजांपैकी सर्वाधिक ३ विकेट वरुण चक्रवर्तीने घेतल्या, तर २ विकेट शिवम दुबेने तर १ विकेट हार्दिक पंड्याने घेतली.






