अहिल्यानगर : गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर मध्ये स्थानिक अन्न औषध प्रशासन विभागाकडून भेसळ दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या प्रकरणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. अहिल्या नगरमधील प्रकरण ताजं असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केमिकल्सचा वापर करून कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. केमिकल आणि इसेन्सचा वापर करून विना परवाना कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी हजारो कुल्फ्या आणि केमिकल्स जप्त केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या बेधडक कारवाईमुळे अनधिकृत काम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुल्फी खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे स्वस्तात मस्त अशा कुल्फी बनवून विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. या सर्व प्रकरणांवर आधीच आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेधडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना नाशिकच्या इगतपुरीतील चर्च हील परिसरात एका जुन्या घरात केमिकल पासून कुल्फ्या बनवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या सर्व प्रकाराची शहानिशा केल्यानंतरच कारखान्यावर छापा टाकला. पण पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जे चित्र समोर होतं ते बघून पोलिसांनाही धक्का बसला. मलाई कुल्फी बनवण्यासाठी सामान्यत: दूध आणि दुधाची मलई याचा उपयोग करून कुल्फी बनवली जाते. मात्र या कारखान्यामध्ये कोबिंद कलर पोस्टर, इसेन्स आणि फ्लेवर कलर ज्यातून मानवी शरीराला हानी पोहोचते. अशा हानिकारक असलेल्या केमिकलपासूनच कुल्फी बनवली जात असल्याचं धक्कादायक चित्र उघडकीस आलं. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला घटनास्थळी पाचारण करत या कारखान्यावर कारवाई केली आहे या कारवाईत २५०० बनावट कुल्फ्या आणि केमिकलचे डबे जप्त करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी इगतपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक- सारिका अहिरराव यांच्याकडून केली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठ- मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणारी मलई कुल्फी कशा पद्धतीने तयार केली जाते, याचे पितळ उघड केलं आहे.







