पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा मक्याचे उत्पादन समाधानकारक झाल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जिल्ह्यांतील रेशन दुकानांत गव्हासोबत तांदळाऐवजी मका देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, पुणे जिल्ह्यातही रेशनवर तांदूळ मिळणार की नाही, याबाबत लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच गहू आणि तांदळाचेच वितरण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील काही भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेतले आहे. उत्पादन वाढल्यामुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि साठवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने रेशन व्यवस्थेत मक्याचा समावेश करण्याचा विचार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वापर मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र, हा निर्णय सर्व जिल्ह्यांना लागू नसून, ज्या भागांत मक्याची उपलब्धता अधिक आहे, तेथेच अंमलबजावणी केली जात आहे. पुणे जिल्ह्यात रेशनवर तांदूळ बंद होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अनेक लाभार्थ्यांनी रेशन दुकानांत चौकशी सुरू केली होती. अखेर जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, पुणे जिल्ह्यासाठी सध्या तरी मका वितरणाचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांतून गहू आणि तांदूळ पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत.







